मुंबई, 03 जून : कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. पुढील काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार आहे. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे.
या वादळामुळे कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक भागात घरावरची पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, अलिबाग परिसरात मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली आहे.
हे तीव्र चक्रीवादळ धडकल्यानंतर सहा तास त्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ताशी 60-70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. बीड, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी 55-65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील कुंडलिका नदीचा परिसर, मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहे.
मुंबईतही वादळाचा प्रभाव दिसून आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यानं वरळी परिसरात मोठे झाडं उन्मळून पडलं निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं वाऱ्याचा वेग वाढला आहे.