मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खचला असून अनेक अपघात होऊ लागले आहेत.
खेड, 27 ऑगस्ट : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाखो चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गावर अनेक मोठं मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अभिनव असं आंदोलन पुकारलं आहे. महामार्गावर खड्यांमध्ये गोट्या खेळण्याची स्पर्धा भरवली आहे. एवढंच नाहीतर माजी आमदार संजय कदम (sanjay kadam) हे थेट खड्ड्यातच झोपले होते. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खचला असून अनेक अपघात होऊ लागले आहेत. कोकणात येणाऱ्या विघ्नहर्त्या गणेशभक्तांवर महामार्गावरील खड्ड्यांचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. २५ ऑगस्टपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जातील अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महामार्गाची पाहणी केली तरीदेखील खड्डे आणि धोकादायक परिस्थिती महामार्गावरील जैसे थे आहे.
त्यामुळे या खड्ड्यांच्या निषेधार्थ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर चक्क गोट्या खेळण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या अनोख्या आणि विचित्र गोट्या खेळण्याच्या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनाचे आयोजक खेड दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम हे चक्क महामार्गावरील खचलेल्या भागात खड्ड्यांमध्ये अक्षरशः झोपून आंदोलन केले. ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता..खातोय बोक्का’ अशी घोषणाबाजी यावेळी कदम यांनी केली. दरम्यान, कोकणाला मोठ्या काळानंतर सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोकणाल निश्चितच होईल. आमच्या मागण्या विरोधकांच्या मागण्यांच्या म्हणून न घेता विकासाला प्राधान्य आमचे मित्र देतील अशी आशा आहे. सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करणार असेल तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सध्या मुंबई गोवा हायवेचा पाहणी दौरा करत आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताकरता भास्कर जाधव परशुराम घाटात हजर होते.