कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी फेटा आणला होता. मात्र फेटा कोणालाच बांधता येत नसल्याने तारांबळ उडाली.
बीड, 17 जुलै : राज्यात अभुतपूर्व राजकीय सत्तासंघर्षानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आता मंत्रिपदातून मुक्त झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुंडे यांनी हातानेच फेटा बांधला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (dhanjay munde) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा फिटनेसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता मुंडेंनी स्वतः फेटा बांधून घेतलेला व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहे.
धनंजय मुंडे यांचा वाढदिवस होता, कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी फेटा आणला होता. मात्र फेटा कोणालाच बांधता येत नसल्याने तारांबळ उडाली. मग काय वेळ न दवडता धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला. मुंडे यांनी आपल्या हातानेच फेटा बांधून घेतला. अत्यंत उत्कृष्टपणे बांधून घेतलेल्या फेट्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादारवरून ट्वीटर युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीत मुंडे भावा बहिणींमध्ये श्रेयवाद सुरू आहे. दोघांनीही या निधीवर दावा केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे. दरम्यान दोघांनी ट्वीट करत निधी आपणच आणल्याचे सांगितले आहे. यामुळे श्रेयवादात हा निधी परत जाऊ नये याची भिती आता जनतेला वाटू लागली आहे.