फाईल फोटो
मुंबई, 27 ऑक्टोबर : दिवाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. ‘वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे’, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
‘युकेच्या पंतप्रधान लीज ट्रूस यांनी जसा राजीनामा दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा’, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.