मुंबई, 6 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेल्या मरकज प्रकरणावर परखड भाष्य केलं आहे. तसंच पुढील काळात होणाऱ्या विविध महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहनही केलं आहे. ‘आताच्या स्थितीत दिल्लीतील मरकज व्हायला नको होती. या संमेलनाला परवानगी नाकारायला हवी होती. महाराष्ट्रातही असे संमेलन होणार होते, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परवानगी नाकारली. दिल्लीत झालेल्या संमेलनाला परवानगी नाकारणे गरजेचं होतं. परवानगी नाकारली असती तर आज जे होतंय, ते पाहायला मिळालं नसतं,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘समाजाताली सर्व घटकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील मेसेज काळजी करण्यासारखे आहे. कारण पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. संशय, कटुता वाढेल अशी स्थिती उद्धभवता कामा नये,’ अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसंच शरद पवार यांनी यावेळी महात्मा ज्योतिराम फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकांना विशेष आवाहनही केलं आहे. हेही वाचा- तबलिगींना घरी बोलावून पाजला चहा, आता 55 जण पोहोचले रुग्णालयात! ‘महात्मा फुले जयंतीला ज्ञानाचा दिवा पेटवावा, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला संविधानासाठी दिवा लावा. शब्बे बारातला घरातूनच प्रार्थना करा. अंधश्रद्धेला बळू पडू नका. दैववादी माणसं चिकित्सक होऊ शकत नाहीत. ज्ञानाचं समर्थन करणारी भूमिका स्वीकारा. काळजी घेतली तर कोरोनावर मात करणं शक्य आहे. 13 दिवस घरात राहिलात, यापुढेही आणखी काही दिवस घरातच राहा,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.