नाशिक, 11 ऑगस्ट : प्राप्तीकर विभागाकडून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून जालना जिल्ह्यात छापेमारी सुरू आहे. यादरम्यान स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांकडून तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता प्राप्तीकर विभागाकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या छापेमारीची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांची कर वाचवण्यासाठीची एक चलाखी जीएसटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्याचे समजते. राज्यातील प्राप्तीकर विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. जालनामधील छाप्यात आतापर्यंत सर्वात जास्त रोख रक्कम सापडली आहे. ३ ते ८ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई करण्यात आली. जालन्यातील २ उद्योजक रडार आणत ही कारवाई करण्यात आली. यापैकी एका कंपनीची वार्षिक उलाढाल १ हजार कोटींच्या वर आहे. यामध्ये एकाच वेळी २ कंपन्यांच्या संबधित ३२ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. जालना, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे आणि कोलकाता अशा ३२ ठिकाणी इन्कम टॅक्सची कारवाई करण्यात आली. पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा झटका, गाशा गुंडाळण्याचे आदेश जालना धाडीत ५६ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून १४ कोटींचे सोने, सोन्याचे दागिने, बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत. ही सगळी जप्त केलेली रक्कम जालन्याच्या SBI शाखेत जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३५० कोटींच्या आसपास बेहिशेबी आर्थिक व्यवहार असल्याचंही समोर आलं आहे. २०० प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि ५० पोलिसांच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. 12 मशीन्स असूनही नोटा मोजण्यासाठी तब्बल 14 तासांचा अवधी लागला.