सत्यजीत तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान
नाशिक, 16 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसने उमेदवारी घोषित करून आणि एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्याकडे अर्ज दाखल करताना काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. दुसरीकडे भाजपनेही कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या बंडामागे भाजपचा हात तर नाही ना? याबाबत राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत. काँग्रेसनेही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नाशिकच्या जागेवर महाविकासआघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात येणार आहे, पण यावरूनही ठाकरे गटामध्येच मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी आणखी एक अपक्ष असलेल्या सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. जंगले नगर जिल्ह्यातले असून याच जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार येत असल्याचं घोलप म्हणाले आहेत. याशिवाय शुभांगी पाटील यांनी केलेला 1 लाख सदस्य नोंदणीचा दावाही खोटा असल्याचा आरोप घोलप यांनी केला आहे. MlC Election : सत्यजीत तांबे होणार निलंबित, काँग्रेस हायकमांडकडून आदेश नाशिकचा ग्राऊंड रिपोर्ट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हापेक्षाही उमेदवाराचा जनसंपर्क महत्त्वाचा ठरतो. आतापर्यंतच्या बहुतेक निवडणुकींमध्ये ज्या उमेदवाराने जास्त सदस्य नोंदणी केली त्याचा विजय होण्याचं प्रमाण जास्त आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अहमदनगरचे सर्वाधिक 1 लाख 16 हजार 319 मतदार आहेत. याशिवाय नाशिकच्या 66 हजार 709, जळगावच्या 33 हजार 544, धुळ्याच्या 22 हजार 593, नंदुरबारच्या 19 हजार 186 मतदारांची नोंदणी झाली आहे. या निवडणुकीसाठी सुधीर तांबेंनी केलेली मतदार नोंदणी 1 लाख 50 हजार एवढी आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनीही 41 हजार मतदारांची नोंदणी केली. तर भाजपचे 30 हजार आणि शुभांगी पाटील यांनी 10 हजार मतदारांची नोंदणी केल्याचं सांगितलं जात आहे. सुधीर तांबे यांनी नोंदणी केलेली मतं तसंच भाजपने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला तर त्यांची आणि विखे पाटील यांची मतं मिळाली तर सत्यजीत तांबे यांचा विधानपरिषदेवर जायचा मार्ग मोकळा होईल. नाशिक पदवीधर निवडणुकीचा घोळ मिटेना! सत्यजित, शुभांगी पाटील की.. ठाकरे-काँग्रेसमध्येही दोन गट