मुंबई, 11 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी दोन्ही नेत्यांना रोखठोक प्रश्न विचारले. आम्ही टॅक्स भरत असूनही आमची चौकशी केली जाते, मग तुमची चौकशी का होत नाही? असा सवाल नाना पाटेकर यांनी विचारला. नाना पाटेकर यांच्या या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत झाली. काय म्हणाले नाना पाटेकर? ‘नगरसेवक निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्यधीश असतो. मला कळतं हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत? त्याची चौकशी का नाही होत? 100 रुपये कमावल्यानंतर मी 30 रुपये टॅक्स भरतोच, 30 रुपये तुम्ही जीएसटी घेताच. हे सगळं केल्यानंतर आमच्या चौकश्या होतात, तुमच्या का नाही होत?’, असं नाना पाटेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचं उत्तर नानांच्या या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. भ्रष्टाचार ही फक्त राजकारणच नाही तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाऊन आलेले, अडकलेले लोक थम्पिंग मेजॉरिटीने जिंकून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात, त्यातून समाजामध्ये भ्रष्टाचाराबाबत कोणताही तिरस्कार तयार होत नाही. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही, वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. गुन्हे केलेला निवडून येतो आणि साधा, सरळ स्वच्छ माणसाचं डिपॉझिट जप्त होत आहे. राजकीय नेते हे बदलू शकत नाही, समाजाला हे बदलावं लागेल, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
याच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. एकनाथराव नुसती मान हलवताय, बोला, असं नाना पाटेकर एकनाथ शिंदे यांना म्हणाले. राजकीय नेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या अपशब्दांबाबत नाना पाटेकर बोलत होते. नेते जेव्हा अपशब्द वापरतात तेव्हा आम्हाला नाही का त्रास होत, आम्हाला नाही का वाईट वाटत? आमच्यात तेवढी पात्रता नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही लोकसेवक आहात, राज्यकर्ते नाही. नानांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी मान हलवली, तेव्हा नानांनी एकनाथराव नुसती मान हलवताय, बोला, अशी प्रतिक्रिया दिली. हेही वाचा ‘एकनाथराव नुसती मान हलवताय, बोला…’, नाना पाटेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, VIDEO