प्रतिकात्मक फोटो
अकोला, 11 डिसेंबर : अनैतिक संबंधातून पती पत्नीच्या खुनाच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. त्यातच आता अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्यात आला होता. आत्महत्या दाखवण्याचा कट फसल्यानंतर ही खुनाची घटना उघडकीस आली आहे. बंडू आत्माराम डाखोरे (वय 45, रा. सावरगाव) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पातूर पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती. तसेच नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. इतकेच नव्हे तर पतीला मारल्यानंतर लोकांना हे कळू नये म्हणून पत्नीने आपल्या पती बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात दिली. मात्र, वैद्यकीय अहवालात ही बाब उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नेमकी काय आहे घटना? ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे हे काम करीत होते. तसेच तिथेच रखवालदार म्हणून राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही राहत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पती बंडू बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे (वय 35) हिने पातूर पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बंडूचा मृतदेह हा 9 डिसेंबरला कार्ला शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. यानंतर वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा झाला. बंडूची आत्महत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. तसेच याप्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला असता आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली. बंडूची पत्नी आणि तिच्या प्रियकराने बंडूची हत्या केल्याचे समोर आले. पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर - मृत बंडू डाखोरे यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे हिचे गजानन शेरू बावणे या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. गजानन बावणे आणि मृत बंडू यांची मैत्री होती. तसेच दोघांमध्ये चांगले संबंध होते. गजानन नेहमी बंडूच्या घरी ये-जा करायचा. त्यातूनच बंडूची पत्नी मीरा आणि गजानन प्रेम सबंध जुळले. दरम्यान, या प्रेमसंबंधांबाबत बंडूला माहित झाले होते. त्यातून दोन्ही पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. यातूनच त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बंडूला संपवायचा निर्णय घेतला. हेही वाचा - पत्नीला पराठा बनवून मागणं जीवावर बेतलं; आधी भांडण झालं अन् मग…, पतीचा भयानक शेवट त्यानुसारच तिने कट रचला. गजानन आणि बंडू हे दोन्ही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले. त्यानंतर गजाननने दुपट्ट्याच्या सहाय्याने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली, असे भासवण्याचा प्रयत्न करत ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती, त्याच्या शेजारील शेतातील विहिरीत बंडू यांचा मृतदेह विहिरित फेकून दिला. यानंतर आरोपी पत्नी मीराने बंडू बेपत्ता आहे, अशी तक्रार पातुर पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता शेजारीलच विहिरीत बेपत्ता असलेल्या बंडूचा मृतदेह सापडला. त्यानंतर हा खळबळजनक खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी मीरा आणि तिचा प्रियकर गजानन बावणे यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.