अकोला, 5 ऑक्टोबर : असं म्हणतात विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय याच दिवशी रामाने रावणाचा अंत करून सत्यावर विजय मिळवला. विजयादशमी हा दिवस भारत देशात रावणरुपी पुतळ्याच दहन करून साजरा केला जातो. पण अकोला जिल्ह्यातलं एक गाव याला अपवाद आहे. अकोल्यातील सांगोळा, असे एक गाव आहे जिथे याच दिवसाला रावणाची पूजा केली जाते. संपूर्ण गाव या दिवशी रावणाची पूजा करायला एकत्र येते. याठिकाणी आरती करण्यात येते आणि हार टाकून विधिवत पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे गाव आहे. अकोला शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हजार दीड हजार लोकसंख्या असणार सांगोळा गाव रावणाचे गाव म्हणून ओळखल्या जात होते. गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला ओट्याच्या चौथाऱ्यावर काळ्या पाषाणाची भव्य मूर्ती दृष्टीस पडते. तीच दशमुखी रावणाची मूर्ती आहे. जवळपास 300 वर्षांपूर्वी याठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला दहा तोंड आहेत, दहाही तोंडाच्या मस्तकावर मुकुट आहेत. हातामध्ये तलवार आहे. मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्र आहेत. मूर्ती युद्ध पेहरावात आहे. नेमकी रावणाची मूर्ती याठिकाणी कशी आली, याची इतिहासामध्ये नोंद नाही. पण मूर्ती इथपर्यंत कशी आली याविषयी गावकरी आख्यायिका सांगतात. काय आहे आख्यायिका - गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास प्रतिष्ठित नागरिकांनी शिल्पकाराला सांगितले. मुर्तीकाराने मूर्ती घडवली. पण शिल्पकाराकडून झाडाची न बनता 10 तोंडी रावणाची प्रतिकृती तयार झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार झाली नसल्याने गावकरी शिल्पकारावर नाराज झाले. बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले. गावाची हद्द सुरू होताच बैल थांबले. कुठल्याच परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते. शेवटी गावकऱ्यांना गावाच्या वेशिवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना केली. गावात हनुमानाचे मंदिर असल्याने ही मूर्ती गावात गेली नसावी, अशी गावकाऱ्यांकडून मूर्तीची आख्यायिका सांगितली जाते. दहा तोंडी रावण पाषाणातील मूर्तीच गावातीलच एक पुजारी दररोज पूजा करतो, पण दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येतात. महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा नव्हता, असे गावकऱ्यांचा मत आहे. पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्या प्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते. आणि ही परंपरा निरंतर सुरूच राहील असा विश्वास गावकऱ्यांना आहे. ‘राम’ आणि ‘रावण’ या दोन विचार धारांमध्ये अडकून सांगोळा या गावातील रावणाचं मंदिर येथे बनू शकलं नाही. मात्र, गावकऱ्यांना आलेल्या अनुभवाने येथे सभा मंडप तयार करण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे. रावण चांगला होता किंवा वाईट हे पुराणाचं सांगू शकते, मात्र, अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाप्रतीची ही श्रद्धा रावणाबद्दल विचार करायला भाग पाडते.