केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर, 10 सप्टेंबर : राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय. अनिश्चित पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतंय. त्यामुळे अनेकदा शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारकडून काही दिलासा मिळेल का? अशा आशेने मदतीची वाट पाहत असतो. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 टक्के नागरीक आजही शेती करतात. त्यामुळे शेती संबंधित उद्योगधंद्यांना चालना मिळावी, तसेच शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून नवनवीन योजना याव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. अर्थात सरकार त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न देखील करतंय. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या भरवशावर राहू नका, असं विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जाते. नागपूरमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना एक वक्तव्य केलं आणि चर्चांना उधाण आलं. नागपुरात अॅग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं. ( ‘बारामती जिंकणं अवघड नाही, मोदींचा पराभव होणार नाही’ ) नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? ‘‘सरकारच्या फार भरवशावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो…’’, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं. “शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे. सरकारच्या भरोशावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली त्यांचा आदर्श घ्या”, असाही सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.