JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका मैदानात, नागरिकांना दिला नवा पर्याय, Video

Nagpur : प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका मैदानात, नागरिकांना दिला नवा पर्याय, Video

महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 17 नोव्हेंबर : शहर स्वच्छतेसाठी नागपूर   महानगरपालिका सजग होऊन अनेक उपाय योजना राबवित आहे. शहराला प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्लास्टिक पिशवी ही एक मोठी समस्या असून राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय सर्वत्र लागू केला आहे. याच अनुषंगाने महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.   नागपूर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परिणामी पिशव्यांची कमतरता व नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर व्हावा म्हणून महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कापडी पिशव्या तयार केल्या जात आहेत. वापरात नसलेल्या कपड्यांपासून या पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. वापरात नसलेल्या कपड्यांपासून पिशव्या  प्लास्टिक पिशव्यांवरील निर्बंधाचे काटेकोर पालन केले जात आहे. महानगरपालिका, इको फ्रेंडली फाउंडेशन आणि स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून मनपा कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पिशव्यांसाठी पुढाकार घेतला आहे. नागपूरकरांना वापरात नसलेले साड्या, चादर, पडदे, पॅन्ट पीस, शर्ट पीस असे कपडे सिव्हिल लाईन येथील मनपा कार्यालयात दान स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या जवळील वापरात नसलेले कपडे दान करून कापडी पिशव्यांच्या उपक्रमाला साथ दिली.   नागरिकांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा शहरातील सर्व झोन कार्यालयात अशी स्टॉल उभारण्यात येणार असून नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कापडी पिशवी हा प्लास्टिक पिशवीचा चांगला पर्याय ठरू शकतो, अनेक  महिलांना व बचत गटांना रोजगार मिळू शकतो. कापडी पिशवी पुन्हा पुन्हा वापरणे सोयीस्कर ठरते. प्रदूषणाचा धोका देखील टाळता येणे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठे उपयुक्त ठरू शकते. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कापडी पिशव्यांचा पर्याय निवडावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी! 20,000 पिशव्या तयार करण्याचा मानस आमची संस्था विविध पर्यावरण पूरक कार्य करत असते. त्यातीलच एक भाग म्हणजे प्लास्टिक पिशवीचे निर्मूलन कार्य होय. आतापर्यंत 1200 साडी व इतर कापडापासून 12000 पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. अजूनही आमचे कार्य सुरू असून लोकांकडून दान मिळतच आहे. 20,000 पिशव्या तयार करण्याचा आमचा मानस असून या पिशव्या तयार झाल्यानंतर आम्ही बाजारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत.   5 रुपयात पिशवी  ही कापडी पिशवी 5 रुपये प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परत वापरल्यानंतर ती बाय बॅक स्वरूपात चार रुपयाला परतही घेण्यात येणार आहे. त्यामुळे खरं तर ही एक पिशवी नागरिकांना फक्त एक रुपयातच मिळणार आहे. या उपक्रमामुळे आत्तापर्यंत 70 महिलांना रोजगार मिळाला असून त्यांच्या देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. एका पिशवी मागे या महिलांना चार रुपये मिळत असून नागरिकांना देखील अल्प दरात पिशवी मिळाल्याने याचा फायदा होत आहे. तसेच अडगळीत पडलेल्या व वापरात नसलेल्या कपड्यांची योग्य वापर होत असल्याने घरातील वापरात नसलेले कापड निघून गेल्याने नागरिकांना देखील सुसह्य होत आहेत, अशी भावना इको फ्रेंडली लिविंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी व्यक्त केली. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या