मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत मेटे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विनायक मेटे यांचं पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अनेक समर्थकांसह राजकीय नेत्यांनी निवासस्थानी गर्दी केली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सदावर्ते यांनी काढला पळ शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेरले. सदावर्ते गो बॅक घोषणा देत कानाखाली मारण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांच्या समय सुचकतेमुळे आक्रमक कार्यकर्त्यांच्या रोषातून सदावर्ते यांनी पळ काढला. मराठा आरक्षणाबाबत कायम विरोधाची भूमिका सदावर्ते यांनी कोर्टात घेतल्याने आज कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सदावर्ते यांच्या येण्याने काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अपघातापूर्वी काय-काय घडलं? मेटे यांनी बीड शहरातल्या शिवसंग्राम भवनमध्ये काल सकाळी 11 वाजता तिरंगा रॅली संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी राजेगावला गावाकडे जाऊन घरी भेट दिली. राजेगाव केजला आल्यानंतर केजमध्ये चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. केज होऊन अंबाजोगाईला गेल्यानंतर अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यासोबत 6 वाजता रेस्ट हाऊसला बैठक घेतली. कालचे रात्रीचे जेवण नऊ वाजता अंबाजोगाईच्या रेस्ट हाऊस वर केले. त्यानंतर अकरा वाजता बीडला पोहोचले आणि त्यानंतर पुढे आजच्या होणाऱ्या मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले. विनायक मेटे त्यांची आज अकरा वाजता बीड शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानक मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासाठी बैठक लावल्याने ते मुंबईला गेले. मेटे हे कार्यकर्त्यांना सांगून गेले की ते त्या रॅलीला उपस्थित राहू शकत नाहीत. विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाक्यावरचा Video समोर, अनेक गोष्टींचा होणार उलगडा बीड शहरात होणार अंत्यसंस्कार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रात्री आणले जाईल आणि त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या अंतदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणलं जाईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.