नालासोपारा, 12 सप्टेंबर : नालासोपारामधील सेंट्रल पार्क येथील रजनी अपार्टमेंटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारी श्रुती पांडे ही 19 वर्षाची मुलगी रविवारी संध्याकाळी सहा वाजता इमारतीच्या टेरेसवर गेली होती. मोबाईलवर बोलत असताना तिचा फोन हातातून सटकला आणि टेरेसच्या सज्जावर पडला. ती मोबाईल काढायला खाली वाकली पण तिचा तोल गेला आणि पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या पत्र्यावर पडली. ही माहिती मिळताच आचोळे येथील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ही मुलगी टेरेसच्या पत्रावर अडकली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्याच्या घराच्या खिडकीची ग्रील कापून पत्र्यावर गेले आणि तिची सुटका केली. वरून खाली पडल्याने तिच्या हाताला दुखापत झाली आहे.
तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवघ्या 17 मिनिटात अग्निशमन दलाने या मुलीची सुटका केली. जितेंद्र तळेकर, मोनिष पटेल, निलेश शिरसाट, सागर वेलणकर, जयेश वनोस आदींनी या मुलीची सुटका केली.