शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी पडझड झाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखतीतून भाष्य केलं
मुंबई, 25 जुलै : कुणाचे आयुष्य बरबाद करून तुम्हाला सुख लाभत असेल असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा होती, याचं उत्तर हे रहस्यामध्येच आहे’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. शरद पवारांनी नाहीतर माझ्याच लोकांनी मला दगा दिला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी पडझड झाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखतीतून भाष्य केलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही मुलाखत 26 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
‘कुणाचे आयुष्य बरबाद करून तुम्हाला सुख लाभत असेल असं मला वाटत नाही. कुणाला मुख्यमंत्रिपद हवे होते, या रहस्यामध्येच उत्तर आहे. पण, माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले. हम दो कमरे में बंद हैं और चावी खो जाय, असं हे सरकार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी माझ्या मनात काही पाप नव्हतं. मला एका गोष्टीचे समाधान नक्की आहे मला सत्तेची चटक लागली नाही. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन दिलं होतं, ते वचन पूर्ण केले आहे, आता वचन पूर्ण केले म्हणून दुकान बंद करून बसणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.