काळाचौकी पोलिसांनी झारखंड मधून आलेल्या दोघांना अटक केली असून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई, 07 सप्टेंबर : आपल्या लाडक्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मंडळ दर मंडळ भेटी देत आहे. गणेशोत्सवात अनेक भाविक मुंबईतील (mumbai ganpati 2022) लालबाग परिसरातील गणेश मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेतात. पण या गर्दीतून जात असताना काळजी घ्या, कारण तुमचे मोबाईल फोन, मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी परराज्यातील चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. परराज्यातून जसे भाविक येतात तसेच चोर देखील हॉटेलमध्ये वास्तव्यास असतात. गर्दीत जायचे आणि मौल्यवान वस्तू लंपास करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी झारखंड येथून फक्त गणेशोत्सव काळासाठी आली होती आणि चोरी करून परत जाणार होती. मात्र त्या आधीच पोलिसानी त्यांना बेड्या घालून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. अश्या आणखी परराज्यातील टोळ्या मुंबईत आल्या असल्याची शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल तपासणी सुरू केली असून त्यांचा शोध घेत आहेत. (हा आमच्या देवाचा अपमान! गणेश मूर्ती विसर्जनावरुन नितेश राणे कोल्हापूर पालिका प्रशासनावर भडकले) काळाचौकी पोलिसांनी झारखंड मधून आलेल्या दोघांना अटक केली असून या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या दोघांकडून किंमती वस्तू आणि मोबाईल हस्तगत केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त - ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. काळाचौकी पोलीस ठाण्याअंतर्गत 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत 3 मोबाईल चोरी झाले आहे. तर तब्बल 40 मोबाईल हरवण्याची तक्रार आहे. तसंच, 2 पर्स चोरीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेण्यासाठीही 3-4तासांची प्रतिक्षा भाविकांना पाहावी लागते. मात्र, यादरम्यान काही लोक मोबाईल चोरतानाचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून देवदर्शन घ्यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.