मुंबई, 24 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने अमित ठाकरे मनसेत सक्रिय होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची क्षणचित्रे ते आपल्या सोशल मीडियावर जनतेसोबत शेअरही करीत आहे. दरम्यान त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं होतं. जर गृहमंत्रिपद दिलं तर पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. यावरुन आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी गृहमंत्री होणार किंवा मला किंवा राज साहेबांना मंत्रिपद मिळणार या बातम्या खोट्या आहेत. लोकांना जोकही समजायला हवे. सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय राज साहेबच घेतील, मी फक्त मनविसेची पुनर्बांधणी करतो असं ते माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना म्हणाले. दुसरीकडे पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरेही संवादयात्रा करीत आहेत. याबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. आदित्य ठाकरे आता कुठे दौऱ्यावर आहे. दीड महिन्यापासून दौरा करतोय. आज शिवसेनेत जे झालं ते जर झालं नसतं तर आदित्य ठाकरेनी हा दौरा केला असता का हा प्रश्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. युवापिढीने राजकारणाकडे पाहताना मनविसे हाच चांगला पर्याय असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेतील फुटीचा आम्ही फायदा घेणार नाही. मनसेतही वादविवाद…. यावेळी त्यांनी मनसे पक्षातील वादाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. मनसेतही वादविवाद आहेत, ते नसतील तर तो पक्ष नाही. वाद असावेत पण वैचारिक वाद असावे, अशी त्यांनी पुष्टी जोडली. नाशिकमध्ये खड्ड्यांची तक्रार नाही स्वतः कार ड्राईव्ह करण्याचा नेत्यांचा ट्रेंड सध्या वाढतोय. मात्र खड्ड्यांमुळे गाडी चालवावीशी वाटत नाही. एकदा राज साहेबांकडे सत्ता देऊन तर बघा. नाशिक महापालिका दिली तिथं एकही खड्ड्याची तक्रार येत नाही. आम्ही करून दाखवलं…