मुंबई, 4 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं आज पालघर येथे मर्सिडीजच्या अपघातात मृत्यू झाला. ते गुजरातहून परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंडोले कुटुंबीय होते. मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ अनायत पंडोले कार चालवत होत्या. आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती दरीयस मंडोले होते. ते JM फायनॅन्शीयलमध्ये CEO आहेत. याशिवाय अनायत पंडोले यांचे सासरे आणि दरीयसचे वडीलही होते. चौघेजण गुजरातच्या उदवाडा येथे गेले होते. उदवाडा हे पारशींचे अत्यंत पवित्र तीर्थस्थळ आहे. ज्याप्रमाणे हिंदूसाठी काशी त्याचप्रमाणे पारशी समाज उदवाडा येथील मंदिराला पवित्र तीर्थस्थळ मानतात. दर्शन घेऊन मुंबईला परतत असताना साधारण तीने ते साडेतीनच्या दरम्यान त्यांच्या मर्सिडीज कारला अपघात घडला. महिला डॉक्टरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सायरस मिस्त्री हे कारच्या मागे बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. सायरस मिस्त्रींसह मर्सिडीजमध्ये होतं प्रसिद्ध पंडोले कुटुंब; कार चालवणाऱ्या महिला डॉक्टरचे सासरेही दगावले! सायरस मोदी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, “सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन हे धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योजक नेते होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्यक्त केला शोक - “टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे.