मुंबई, 18 ऑगस्ट : मुंबईतील कलिना ( kalina ) परिसरातील स्थानिक नागरिकांना गेले सात ते आठ महिने दूषित पाण्याच्या ( polluted water ) समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नळाला पाणी आल्यानंतर कधी पाणी तेलकट तर कधी पाण्याचा वास येतो. या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सात ते आठ महिने झाले दूषित पाण्याची समस्या सुटत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईतील कलिना परिसरातील महात्मा फुले नगर, लाल बहादूर शास्त्री नगर परिसरातील स्थानिक नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दूषित पाणी येत असल्याने पिण्यासाठी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे या दूषित पाण्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. दूषित पाण्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक प्रशासनकडे करत आहेत. हेही वाचा : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती पिण्यासाठी पाणी घ्यावे लागते विकत गेले सात ते आठ महिने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या पावसाळा आहे. डेंग्यू मलेरिया याची साथ पसरली आहे. त्यातच दूषित पाणी येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही लोकांना तर या दूषित पाण्यामुळे अलर्जी झाली आहे. त्यामुळे आम्ही यावर धडक मोर्चा देखिल काढला होता मात्र अजुनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. पिण्यासाठी तसेच जेवण बनविण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक अतुल सोनावणे यांनी दिली आहे. शमीमा शेख गेले अनेक वर्षे कलिना परिसरातील महात्मा फुले नगर येथे राहतात. शामिमा म्हणाल्या की, गेले सात ते आठ महिने आम्हाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. कधी पाण्याचा रंग वेगळा असतो, कधी पाणी गढूळ येते तर कधी पाणी तेलकट येत असते. गटाराच्या पाण्यासारख्या पाण्याचा वास येतो. आम्हीतर तर पिण्यासाठी पाणी विकत आणतो. महिन्याला 6 हजार रूपये इतका खर्च येतो आणि त्यात पाणीपट्टी देखिल भरावी लागत असून असे दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आमची दूषित पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी नागरिक शमीमा शेख यांनी केली आहे. हेही वाचा : Nashik : श्रीरामांनी वास्तव्य केलेल्या नाशिक शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? VIDEO लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मार्ग काढला जाईल यासंदर्भात आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पालिकेचे अधिकारी धनंजय रॉय म्हणाले की, आम्हाला तक्रार प्राप्त झाली असून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मार्ग काढला जाईल.