मुंबई, 19 जुलै : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गेल्यावर्षी जून महिन्यात दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही सोबत होते. पण उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आणि एक तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार फुटले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खासदारांना माझ्याकडून युतीचे सर्व प्रयत्न करुन झाले आता तुम्ही करा, असं सांगितल्याचा मोठा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले? उद्धव ठाकरेंनी आम्हाला बैठकीत सांगितलं होतं की, मी सुद्धा माझ्यापरिने युती करण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो त्यावेळी मोदी यांच्यासोबत एक तास चर्चा झाली. या चर्चेत युतीविषयी चर्चा झाली. ही बैठक गेल्यावर्षी जूनला झाली. त्यानंतर जुलैला अधिवेशन झालं. पण त्या अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर कारवाई झाली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटलं की, एकीकडे युतीचे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे अशाप्रकारची कारवाई करायची. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी युतीसाठी प्रयत्न झाले पण भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याने ती गोष्ट तेव्हा घडू शकली नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. माझ्या परिने मी युतीचे सर्व प्रयत्न केले. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. “आमदारांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना उद्धव ठाकरे यांनी बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. 21 जूनला सर्व खासदारांनी पक्षासोबत राहू, असं सांगितलं होतं. पण आम्ही त्यावेळी आमची भूमिका मांडली होती. आम्ही एनडीएच्या युतीतून निवडणूक लढवली आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचा त्रास होतोय, अशी भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली होती. ठाकरेंनी आमची भूमिका मान्य केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर निश्चितच त्या निर्णयाचं मी स्वागत करेन, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत हे देखील होते”, असा मोठा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला. “उद्धव ठाकरेंनी 2019 च्या लोकसभेवेळी जो वचननामा लिहिला होता त्याच वचननाम्यावरुन आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आम्ही प्रचंड मतांनी विजयी झालो. पण दुर्देवाने नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्यात आला. या प्रोग्रॅममध्ये शिवसेनेच्या वचननाम्याबद्दल काहीच नव्हतं. संभाजीनगर विषयी कॉमन मिनिमम प्रोगॅममध्ये कुठेही उल्लेख नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व खासदार इथे उपस्थित आहोत. आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे”, असं राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.