मुंबई, 11 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जूनला (14th june birthday) वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सर्व मनसैनिकांना (MNS) आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून त्यांनी हे आवाहन केलं आहे. सध्या कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. तसंच आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, बाहेर प्रवास करणं टाळावा. त्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नका अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रात काय लिहिलं दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो, तुम्ही फार प्रेमानं अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदाला यायला लागलं आहे. परंतु, परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२, २०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.
हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे, प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मनःपूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच रहा. जिथे आहात तिथे सुरक्षित रहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमानं याल आणि आपली भेट होणार नाही असं उनको व्हायला तुम्ही सर्वांनी ह्या करोना काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात रहा. अजूनही आपली माणसं दुःखात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवानं आपल्याला सोडून गेले. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या. त्यांच्यासाठी आत्ता करता आहात तसंच काम करत रहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आत्ता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन. लवकरच भेटू. राज ठाकरे