शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा फाईल फोटो
पंढरपूर, 10 सप्टेंबर : “भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत. कारण ते देशातील लोकांचा आत्मा आहेत”, असं भाकीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे आज विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी कधीच पराभूत होणार नसल्याचं विधान केलं. “बारामती जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. या देशात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही”, असं विधान सुरेश खाडे यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पराभव होऊ शकेल का? असा प्रश्न विचारला असता मंत्री खाडे यांनी काही क्षण स्तब्ध राहत मोदी पराभूत होणार नाहीत. ते देशाचा आत्मा आहेत. ते जनतेचा आत्मा आहेत. त्यामुळे ते पराभूत होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. भाजपला बारामती का जिंकायचीय? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. बारामतीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील उमेदवार निवडून येण्याची गेल्या काही वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने बारामतीत प्रचंड ताकद लावली होती. विशेष म्हणजे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला तोडीस तोड आव्हान दिलं होतं. भाजपने खूप प्रयत्न केले होते. पण तरीही गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, भाजप आतादेखील 2024 च्या निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबातील उमेदवाराच्या पराभवासाठी तयारीला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा. भाजप अनेक माध्यमातून बारामतीत जिंकून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. ( आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, हायकोर्टात याचिका दाखल ) बारामतीत पवार कुटुंबियातील उमेदवाराचा पराभव करणं हे भाजपचं ध्येय आहे. कारण पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होईल, असा भाजपचा विचार आहे. त्यांच्या या विचारामागे मोठं राजकीय गणित आहे. कारण बारामती मुख्य उमेदवाराचा पराभव केला तर आपण अर्धी लढाई आपण जिंकू, असा भाजपचा डाव आहे. पण दुसरीकडे बारामती जिंकणं इतकं सोपंही नाही. कारण शरद पवार यांची राजकीय रणनीती भल्याभल्यांना समजलेली नाही. त्यामुळे बारामतीत कोण बाजी मारतं हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईलच. पण भाजपने त्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी सुरु केल्याचं चित्र आहे.