मुंबई, 21 डिसेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही मराठी माणसाचे मानबिंदू. दोघांनीही आपल्या कर्तृत्वातून जगाच्या नकाशावर छाप पाडली. क्षेत्र वेगवेगळी असली तरी दोघांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली. पण सचिनला बाळासाहेबांबद्दल काय वाटतंय? त्याच्या मनात बाळासाहेबांच्या काय आठवणी आहेत. याची उत्सुकता नसेल असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. बाळासाहेबांवर आधारीत ठाकरे सिनेमा लवकरच रिलिज होतोय. त्यानिमित्तानं सचिननं बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय. 2019 मधील सर्वांत प्रलंबित चित्रपट ‘ठाकरे’च्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु झाली असल्यामुळे फक्त निर्मातेच नव्हे तर प्रेक्षक आणि सेलिब्रिटीज अशा सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. क्रिकेटपटू भारत रत्न सचिन तेंडुलकरने ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एका व्हिडिओद्वारे बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. येत्या 25 जानेवारीला संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून अखंड जगाला हृदयसम्राटांच्या आठवणीत रममाण होण्यास भाग पडेल यात काही शंकाच नाही. बाळासाहेबांसमवेत घालवलेल्या क्षणांबद्दल सांगताना सचिन म्हणतो की, “शिवाजी पार्क मध्ये आम्ही क्रिकेट प्रॅक्टिस करत असताना ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंची तेथे सभा भरायची तेव्हा तेथील सभेची जोरदार सुरू असलेली तयारी, तेथील लोकांमधील ओसंडून वाहणारा उत्साह आणि बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आसुसलेले श्रोते हे वातावरण पाहण्यासारखं असायचं. मी जेव्हा कधी त्यांना भेटायला जायचो तेव्हा प्रत्येकवेळी निघण्यापूर्वी ते न विसरता मला म्हणायचे… जा, देशाचं नावं उज्ज्वल कर. तुझे सर्वोत्तम दे.” बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र सामानासाठी लिहित असताना, तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला “जर तुम्ही सचिनवर इतके प्रेम करता तर तुम्ही त्याला भारत रत्न का देत नाही?’’ असा प्रश्न करुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याचे आवाहन केले होते. सचिन तेंडुलकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच विशेष अनुबंध जपले आहेत. हे दोन्ही महाराष्ट्राचे गौरव क्रिकेटचे चाहते आहेत. सचिन तेंडुलकरने ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बाळासाहेबांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा म्हणजे लाखो-करोडो लोकांच्या एका मास्तराने त्यांच्या दुसऱ्या मास्तराला वाहिलेली ही भावपूर्वक श्रद्धांजलीच आहे असंच म्हणावं लागेल. VIDEO : अबब.. जळगावात शिजलं 3 हजार किलो वांग्याचं लज्जतदार भरीत