मुंबई, 5 नोव्होंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. 17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत, जयंत पाटील, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे नेते उपस्थित होते. ‘सरकार कायदेशीर का बेकायदेशीर हे अजून ठरायचं आहे, पण राज्यपालांकडून महाराष्ट्रात आपल्या महापुरुषांचा सातत्याने अपमान होत आहे. कर्नाटक सरकार आक्रमक भूमिका घेत आहे. महाराष्ट्रातील गावं दुसऱ्या राज्यात जायचं म्हणत आहेत. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. लवकरच कर्नाटकात निवडणूक होत आहे, म्हणून आपली गावं त्यांना देणार का?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ‘आज मंत्री कर्नाटकात जाणार होते, पण तिथल्या मंत्र्यांनी इशारा दिला म्हणून गेले नाहीत,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ‘आम्ही बेळगावला कधीही जाऊ शकतो. ज्याची जबाबदारी आहे ते स्वीकारणार आहेत का नाही? का गुवाहाटीला जाऊन बोलणार? सरकारने जाहीर करावं आम्हाला जमणार नाही, मग बेळगाव आणि सरकार चालवण्यापासून मी सर्व करतो,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मागच्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत झालेल्या वक्तव्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली, तर भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या अक्कलकोट आणि सोलापूरमधल्या गावांवर दावा सांगितला, या सगळ्या मुद्द्यांविरोधात महाविकासआघाडीने मोर्चाचं आयोजन केलं आहे.