मुंबई, 14 ऑगस्ट : राज्यात पुढचे दोन दिवसा पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान देशासह राज्यात 75 वा स्वातत्र्य: दिन साजरा केला जात आहे. (Maharashtra Rain) या पार्श्वभुमीवर राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच पुढचे दोन दिवस पाऊस असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. राज्यात 15 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस होत आहे. बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
हे ही वाचा : पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, अनेक वाहनं अडकली, अंगावर काटा आणणारे Live Video
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये संततधार पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी राज्याच्या विविध भागात हलका पाऊस सुरूच आहे. शनिवारीही राज्यात विविध ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम होता.
सोमवारी पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी या दक्षिण कोकणातील विभागात मुसळधार पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घाट विभागात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी 18 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे.
हे ही वाचा : घराबाहेर पडण्याआधी लोकलचं शेड्युल नक्की पाहा नाहीतर होईल नुकसान
पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे. सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.