मुंबई, 13 जून: राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून अनलॉकची (Maharashtra Unlock) प्रक्रिया सुरु झाली आहे. पाच टप्प्यात राज्यातील जिल्हे अनलॉक होत आहेत. त्या जिल्ह्यांमधील जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होत आहेत. तर काही भागात अजूनही निर्बंध आहेत. अशातच राज्यातील कोरोनाच्या (Corona Virus) आकडेवारीतही बदल घडताना दिसत आहे. शनिवारी आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण 10 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत शनिवारची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. तसंच 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. हेही वाचा- भाजपला मोठा झटका; एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम शनिवारच्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात राज्यात 14 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण काही प्रमाणात वाढलेलं दिसतंय. दुसरीकडे नव्या कोरोना रुग्णांची संख्या अजूनही 10 हजारांच्या वर असल्यामुळे एकूण पॉझिटिव्हीटी रेट अद्याप नियंत्रणात आलेला दिसत नाही आहे. दरम्यान राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनापुढे अजूनही राज्याचा मृत्यूदर ही चिंताजनक बाब आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे अद्याप राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के आहे. गेल्या 24 तासात राज्यात 360 मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 333 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे.