JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Exclusive : 'राज्याकडे अवघ्या पाच दिवसांचा कोळसासाठा शिल्लक', मोठं वीजसंकट खरंच घोंघावतंय?

Exclusive : 'राज्याकडे अवघ्या पाच दिवसांचा कोळसासाठा शिल्लक', मोठं वीजसंकट खरंच घोंघावतंय?

राज्यात विजेची उचांकी मागणी 28 हजार मेगावॅट पर्यंत पोहोचू लागली आहे. पण सरकारी वीजनिर्मिती केंद्रात 16 हजार मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठामध्ये मोठी तफावत असल्याचं दृश्य आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल : राज्यावरील वीजसंकट (Maharashtra Power Crisis) दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. राज्याकडे कोळासाचा साठा (Coal storage) फार कमी आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडिंगला (load-shedding) सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राज्यावरील संभाव्य वीजसंकटाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधारी सरकार या प्रश्नाचं निरसन करतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दुसरीकडे राज्यात वीजनिर्मिती करणारी महाजेनको (Mahagenco) कंपनीने आगामी संकट लक्षात घेता काही उपाययोजन केल्या आहेत का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे (Sanjay Khandare) यांच्याशी बातचित केली. त्यांच्याशी बातचित केल्यानंतर राज्यावरील वीजसंकट खरंच खूप गडद असल्याचं जाणवलं. पण कोळसा उपलब्ध झाल्यास राज्यावरील भारनियमन किंवा लोडशेडिंगचं संकट दूर होऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात विजेची उच्चांकी मागणी 28 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचू लागली आहे. पण सरकारी वीजनिर्मिती केंद्रात 16 हजार मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठामध्ये मोठी तफावत असल्याचं दृश्य आहे. ही तफावत दूर करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून वीज विकत घेण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. त्यातच कोळशाचा अपुरा पुरवठा, यामुळे कोळशापासून वीजनिर्मिती केंद्रावर मोठं संकट उभं राहिलं आहे. हे संकट केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित नाही. कारण पावसाळ्यात कोळशाचा गहन प्रश्न निर्माण होणार आहे. अशा स्थितीत वीजनिर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनी महाजेनकोने काही तजवीज केलीय का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. (‘ अनेक केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांचा मार खाल्ला’, मनसे सचिवांचा भावनिक राजीनामा ) महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याकडे अवघ्या 5 दिवसांचा कोळसासाठा शिल्लक आहे. पुरेसा कोळसा मिळाला तर वीजनिर्मितीही जास्त होईल. जर कोळसा मिळण्यात सातत्य राहील नाही तर राज्यावर मोठं संकट उभं राहू शकतं, असा इशारा त्यांनी दिला. तसेच राज्याला रोज 1 लाख 40 मेट्रिक टन इतका कोळसा आवश्यक आहे. पण राज्याला 1 लाख 5 ते 30 हजार मेट्रिक टन कोळसा मिळतो. कोळसा कमी मिळाला तर राखीव वापरला जातो, असं खंदारे यांनी सांगितलं. “देशभरात कोळशाचं संकट आहे. पावसाळ्यात किमान 12 दिवस पुरेल इतका कोळसा साठवणं गरजेचं आहे. कोळसा उपलब्ध होणं आणि त्याची वीजनिर्मिती केंद्रापर्यंत वाहतूक करणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. पुरेसा कोळसा मिळाला तर लोडशेडिंगच संकट संपू शकतं”, अशी भूमिका महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या