भरत केसरकर, सिंधुदुर्ग 11 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील माणगाव खुराना या भागात जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. (Konkan Rain Alert) यामुळे 26 गावांना जोडणारा आंबेरे पूल पाण्याखाली गेला आहे. आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने माणगाव खोऱ्यातील 26 गावांचा संपर्क तुटला आहे, तर माणगाव खोऱ्याला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे.
आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. आंबेरी पुलावर गाड्या अडकून वाहतूक ठप्प झाली. तर या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. माणगाव खोऱ्यातील शिवापूर, उपवडे, आंजीवडे, महादेवाचे केरवडे, पुळास, माणगाव, वाडोस, गोठोस, दुकानवाड, हळदीचे नेरूर, वसोली, साळगाव, आंबेरी, कांदुळी, मोरे आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
हे ही वाचा : कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट राज्यात असा आहे पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे कोकणात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोल्हापूर भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांसह पावसाचा इशारा पालघर ठाणे, मुंबईमध्ये देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : नियतीही कठोर झाली! देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, चिमुकला वाचला पण…
दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे. अनेक भागात तर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा, तसेच उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.