कोल्हापूर, 13 ऑगस्ट : ‘शिवसेना भवनासाठी (shivsena bhavan) जागा शोधत आहोत यावर मी भाष्य करणार नाही. खरा देव हा विचारामध्ये असतो, मात्र विचारांपासून लांब गेलो मग देव राहत नाही, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसकर (Deepak Kesarkar ) यांनी प्रतिशिवसेना भवनाच्या चर्चेवर भाष्य केलं. शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केले आहे. एकीकडे शिंदे गट पक्षचिन्ह मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे आता प्रतिशिवसेना भवन स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, यावर केसरकर यांनी भाष्य केलं. ‘शिवसेना भवनासाठी जागा शोधत आहोत यावर मी भाष्य करणार नाही. खरा देव हा विचारामध्ये असतो, मात्र विचारांपासून लांब गेलोय, मग देव राहत नाही, असं म्हणत केसरकरांनी प्रतिशिवसेना भवनावर भूमिका मांडली. संजय शिरसाट यांनी काय ट्वीट केलं यावर भाष्य करणार नाही. पण दुसऱ्या टप्यात शिरसाट यांचा समावेश स्वाभाविक आहे. भरत गोगावले यांचाही समावेश होईल. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार सुद्धा लवकरात लवकर होईल, असंही केसरकर यांनी सांगितलं. ‘संजय राठोड प्रकरणात मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. पण संजय राठोड यांच्या बाबत काही दिसून आलेले नाही तसे काही झाले नसताना आरोप होत आहेत. संजय राठोड यांच्याबाबत दोष आढळला नाही तर त्यांना पुन्हा मंत्री करू असे तत्कालीन मुख्यमंत्रीच म्हणाले होते. आता हाच शब्द शिंदे साहेबांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे राठोडांना मंत्रिमंडळात सामील केलं, असं केसरकर यांनी सांगितलं. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवायची की नाही हा न्यायालयाचा प्रश्न आहे. पत्राचाळ प्रकरणात राऊत यांनी सक्षम भूमिका मांडावी त्यांना न्याय मिळेल, त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे असणार म्हणून कारवाई केली आहे. इतर आत गेले संजय राऊत मात्र बाहेर होते मुंबईतील मोठ्या घोटाळ्यापैकी एक आहे,असंही केसरकर म्हणाले अतिवृष्टीसाठी केंद्राच्या निकषापेक्षा दुप्पट मदत आम्ही देऊ. पंचनामे होऊन मदत वेळेत मिळेल. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे कार्यरत आहेत. पन्हाळा बाबत मंत्रिमंडळात बाजू मांडणार आहे, असं केसरकर यांनी सांगितलं.