कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांची मोठी डोकेदुखी झाली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात गवे नागरी वस्तीत येत असल्याने नागरिक आणि गवे असा नेहमी संघर्ष पहायला मिळत आहे. मागच्या सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एका महिलेचा गव्याच्या हल्ल्यात जीव गेला असता. आजऱ्यातील भावेवाडीत ही घटना घडली आहे. गावात गवा शिरल्याने गावकरी चांगलेच हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितनुसार, आजरा तालुक्यातील भावेवाडीत गवा शिरलेल्या ग्रामस्थ चांगलेच हैराण झाल्याचे दिसून येत आहे. सैरभैर झालेल्या या गव्याच्या हल्ल्यातून सुदैवाने एक महिला बचावली. काल (दि.20) गुरुवारी दुपारच्या दरम्यान एक गवा भावेवाडी गावामध्ये शिरला. गवा आल्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहताच ग्रामस्थदेखील त्याला हुसकावून लावण्यासाठी पुढे सरसावले.
हे ही वाचा : कोल्हापूरकरांचा नाद ‘लय भारी’, यंदा फोडणार ग्रीन फटाके, Video
दरम्यान या सर्व प्रकारात रस्त्यावरून चाललेल्या एका महिलेसमोर हा गवा आल्याने गवा थेट त्या महिलेच्या अंगावर गेला असता परंतु त्या महिलेच्या चपळाईने गव्याची धडक होता होता चुकली. सुदैवाने गावकऱ्यांचा व कुत्र्यांचा गोंधळ ऐकून महिलेने तिथून पळ काढला. यामध्ये महिला तिथून बाजूला झाल्याने गव्याच्या हल्ल्यातून बचावली. कालपासून या गव्याने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
आजरा तालुक्यात गवा आणि टस्करांची दहशत
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याला जंगलाचा प्रदेश जास्त असल्याने या भागात टस्कर आणि गव्याचे प्रमाण जास्त आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी टस्कर नागरी वस्तीत आल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. वारंवार टस्कर आणि गवे नागरी वस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! विदर्भ, मराठवाडा नाही कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
पिकांसह काही ठिकाणी झोपड्यांचे नुकसान टस्कर आणि गव्यांमुळे झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. परंतु मागच्या कित्येक वर्षांपासून हीच स्थिती असल्याने स्थानिक यामुळे त्रस्त झाले आहेत.