कोल्हापूर, 6 जानेवारी : शहर परिसरात रस्त्याच्या बाजूला लावून ठेवलेल्या वाहनांमुळे बऱ्याचदा अडथळे निर्माण होत असतात. या धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांनर कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण कक्ष यांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना या पद्धतीची वाहनं रस्त्याच्याकडेला दिसली तर वाहतूक विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहनही प्रशासनानं केलंय. कोल्हापूरामध्ये सध्या या पद्धतीच्या बेवारस वाहनांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईत ही वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी या वाहनांवर मालकांच्या नावानं नोटीस लावण्यात आली होती. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी याआधी वाहतूक समितीची बैठक पार पडली होती. यामध्ये वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून असणारी बेवारस वाहने जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर गेली कित्येक वर्षे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनांवर कारवाई करत ती हटवण्यात आली आहेत. ही सर्व वाहने बुद्ध गार्डन परीसरात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. 72 वर्षांचे आजोबा 600 किलोमीटर सायकल चालवणार, पाहा काय आहे उद्देश Video कुठे झाली कारवाई ? कोल्हापूर शहरातील तांबट कमान, पद्माराजे उद्यान, भगतसिंग तरुण मंडळ, दसरा चौक, व्हिल्सन पुल, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, देवेज्ञ बोर्डिंग, बेलबाग गार्डन, हुतात्मा पार्क या परिसरात बंद अवस्थेत धूळ खात पडून असलेल्या वाहनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यावर बऱ्याच जणांनी आपली वाहने हटवली होती. ज्यांनी वाहने हलवली नव्हती त्यांची वाहने टो क्रेनच्या साहाय्याने उचलून जप्त करण्यात आली आहेत.
नागरिकांना आवाहन नागरिकांना शहर परिसरात अशी बेवारस पडून असणारी वाहने निदर्शनास आली तर त्या वाहनांचे फोटो, माहिती, पत्ता वाहतूक शाखेच्या व्हॉट्सॲप नंबर वर पाठविण्याचे आवाहन देखील स्नेहा गिरी यांनी केलं आहे. व्हॉट्सॲप क्रमांक : 7030017359 शहर वाहतूक शाखा कार्यालय - 0231, 2641344