JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रंकाळ्यातील पक्षी निरिक्षणात आढळले 7 विदेशी पाहुणे, पाहा काय आहे खास Video

रंकाळ्यातील पक्षी निरिक्षणात आढळले 7 विदेशी पाहुणे, पाहा काय आहे खास Video

रंकाळ्यावर दरवर्षी अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात. नुकत्याच घेण्यात आलेल्या एका पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमात तब्बल 29 प्रजातींचे पक्षी रंकाळा परिसरात निदर्शनास आले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 19 डिसेंबर : कोल्हापूर चे वैभव असणारा रंकाळा तलाव हा जसा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, तसा तो पक्षांच्या बाबतीत देखील खूप महत्वाचा आहे. कारण या ठिकाणी दर वर्षी अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात. तर अनेक स्थानिक पक्षांचे हक्काचे घर रंकाळा हेच आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या एका पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमात तब्बल 29 प्रजातींचे पक्षी रंकाळा परिसरात निदर्शनास आले आहेत. रंकाळा तलाव परिसरात नेचर कॉन्जर्वेशन सोसायटी (नेकॉन्स) या संस्थेतर्फे बर्ड्स ऑफ कोल्हापूर आणि निसर्ग अंकूर या दोन संस्थांच्या साथीने नुकताच पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पक्षीनिरीक्षकांनी 7 विदेशी पक्षासह 29 प्रजातींच्या एकूण 158 पक्ष्यांची नोंद केली आहे. सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे रंकाळ्याच्या पाणथळ भागात अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी वास्तव्यास आले आहेत. यंदाच्या डिसेंबर महिन्यात रंकाळा तलावावर याआधी झालेल्या पक्षीनिरीक्षणामध्ये सुमारे 30 हुन अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे. यातील बहुतांश पक्षी हे पाणथळ परिसंस्थेच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतात, अशी माहिती पक्षीमित्र सत्पाल गंगलमले यांनी दिली आहे.

Kolhapur : रेणुका देवीच्या आंबील यात्रेला का आहे इतकं महत्त्व? Video

संबंधित बातम्या

कोणकोणते पक्षी आले निदर्शनास? यावेळी पक्षी निरीक्षणात वारकरी, हळदी-कुंकू बदक, शेकाट्या, राखी बगळा, जांभळी पाणकोंबडी, खंड्या आदी पक्षी निदर्शनास आले. तर काही स्थलांतरीत पक्षी देखील यावेळी रंकाळ्यावर दिसले. यामध्ये ब्लिथचा वेळूतला वटवट्या, पायमोज वटवट्या, ठिपकेवाली, तुतारी, पिवळा धोबी, पांढरा धोबी हे पक्षी दिसून आले आहेत. रंकाळा सुशोभीकरणावेळी पक्षांचा अधिवास जपला जावा रंकाळा तलाव हे कोल्हापूरकरांसाठी प्रभातफेरीचे, सायंकाळच्या विरंगुळ्याचे, निवांत क्षण अनुभवण्याचे ठिकाण तर आहेच. परंतु जैवविविधतेच्या दृष्टीने देखील समृद्ध असा हा परिसर आहे. विशेषतः विविध जातीच्या पक्ष्यांसाठी तर रंकाळा हे एक हक्काचे आश्रयस्थान आणि अन्नाचा स्रोत आहे. अनेक पक्षी घरटी करण्यासाठी आणि रात्रनिवाऱ्यासाठी रंकाळ्याच्या काठावरील झाडांचा आधार घेतात. त्यामुळे रंकाळा तलाव परिसरात भविष्यातील कोणतेही विकासप्रकल्प राबविताना तेथील नैसर्गिक परिसंस्थेला आणि त्यातील जैवविविधतेला बाधा येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे, असे देखील सत्पाल यांनी स्पष्ट केले. गुगल मॅपवरून साभार पत्ता रंकाळा तलाव, कोल्हापूर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या