कोल्हापूर,15 जानेवारी:‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन देशातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आणखी एका भाजप नेत्याने नरेंद्र मोदींच्या नावाने मुक्ताफळे उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानच असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे. सुरेश हळवणकर यांच्या वक्तव्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. हळवणकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आमदार हळवणकर यांनी शिवाजी महाराजांच्या तुलनेबाबत पुस्तकाचं समर्थन केले आहे. मोदींशी तुलना केल्याने महाराजांचा सन्मान वाढेल, असे वक्तव्य हळवणकर यांनी केले होते. कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये पुरोगामी संघटना आणि शिवप्रेमीकडून हाळवणकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हाळवणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुरेश हळणकर यांनी केला हा दावा… हळवणकर म्हणाले, नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे. पुस्तकाच्या लेखकाचे मी समर्थन करतो, असेही ते म्हणाले.हळवणकर यांनी मोदींनी सुरु केलेल्या योजनांचा संदर्भ देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना शेतकऱ्याच्या खात्यात 6 हजार रुपये जातील अशी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करुन शेतकऱ्याला मोदींनी सावरले आहे. या युगात मोदींनी केलेले काम नक्कीच दखलपात्र आहे, असे हळवणकर यांनी यावेळी सांगितले.