मुंबई, 22 ऑगस्ट : एसी लोकलच्या (Mumbai AC Local) फेऱ्या वाढवल्यामुळे कळवा स्टेशनवर 19 तारखेला प्रवाशांनी आंदोलन केलं. कळवा कारशेडमधून (Kalwa Carshed) निघणाऱ्या लोकल ठाणे ते सीएसएमटी असतात, या लोकल कळवा कारशेडमधून निघतात तेव्हाच इथले प्रवासी या लोकलमध्ये चढतात, पण यातली एक लोकल एसी केली गेली. एसी लोकलचे डब्याचे दरवाजे बंद असल्यामुळे प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढता आलं नाही, त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं. पाचवा आणि सहावा ट्रॅक असूनही कळव्यामध्ये फास्ट ट्रेन थांबत नसल्याबद्दलही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान या आंदोलनाबाबत स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. ‘रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी जीवाचा खेळ झाला आहे. ज्याची गरज आहे त्याकडे लक्ष न देता ज्याची गरज नाही; त्या सोईसुविधा वाढविण्यासाठी रेल्वे प्रयत्न करीत आहे. 90 टक्के लोकांना एसी लोकलची गरजच नाहीये’, असं आव्हाड विधानसभेत म्हणाले.
कळवा ते सीएसएमटी एसी ट्रेनचं रिटर्न तिकीट 200 रुपये आहे, तर लोकलचा सामान्य महिन्याचा पास 215 रुपये आहे, त्यामुळे लोकांच्या मनात उद्रेक आहे. हा उद्रेक मुंबईमध्ये दिसत आहे. कोणीही न बोलावता 700 लोक येणं हे आश्चर्यकारक आहे. शासनाने हा प्रश्न गांभिर्याने घ्यावा. हे कायदा सुव्यवस्थेमध्ये रुपांतरित होऊ शकतं, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
एसी गाड्यांच्या फे-या वाढवून साध्या गाड्यांच्या फे-या कमी केल्या जात आहेत. त्यातून इतकी गर्दी होते की, रेल्वेमध्ये चढता देखील येत नाही. अनेकजण ट्रेन पकडण्याच्या धावपळीत ट्रेनला लटकून खाली पडतात आणि त्यांना जीव गमवावा लागतो. ही समस्या गंभीर आहे. या समस्येला वाचा फोडावीच लागेल, असंही आव्हाड म्हणाले.