मुंबई, 17 ऑगस्ट : सिंचन घोटाळ्याचं (Irrigation Scam) भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Clean Chit) यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणीचा क्लीन चीटचा अहवाल उच्च न्यायालयाने (High Court) स्वीकारलेला नाही. उच्च न्यायालयासमोर हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळीच शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. शपथ घेताच अजित पवार यांना सिंचन घोटाळा मध्ये क्लीन चीट देण्यात आली होती. सिंचन घोटाळ्याचा अहवाल उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असेल तर, यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकरणात भाजपने अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचं नाव घेत राज्यभर आंदोलनं केली. एकीकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट मिळाली नसल्याचं समोर येत असतानाच, काल मोहित कंबोज यांनी केलेल्या काही ट्वीटमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटेल, असं ट्वीट कंबोज यांनी केलं होतं. तसंच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी, ज्याची फाईल परमबिर सिंग यांनी 2019 साली बंद केली होती, असंही कंबोज म्हणाले.
अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत या नावांनंतर पाचव्या नावाच्या ठिकाणी कंबोज यांनी गाळलेली जागा ठेवली होती. आपला स्ट्राईक रेट 100 टक्के असल्याचंही ते या ट्वीटमध्ये म्हणाले होते.