'विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
पनवेल, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांचं निधन झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं. ‘विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास मला माहिती मिळाली. त्यांच्या गाडीला अपघात कसा याची माहिती घेत होतो. त्यानंतर रुग्णालयात आलो तेव्हा साधारणपणे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचं निधन झालं अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला, असंही फडणवीस म्हणाले. ‘तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे. गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दरम्यान, मेटे यांच्या निधनाची अत्यंत दु:खद आणि वेदनादायी बातमी आहे. विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा आरक्षणासाठी मेटेंनी लढा दिला. अनेक आंदोलनं केली. शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी त्यांनी काम केलं होतं. प्रत्येक वेळा त्यांची भेट झाली तेव्हा ते मराठा आरक्षणाबद्दल बोलत होते. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ‘आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. याच बैठकीसाठी ते येत होते. नेमका त्यांचा अपघात कसा झाला याबद्दल चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.