Nashik: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addresses a passing out parade of probationary police sub-inspectors at the Maharashtra Police Academy (MPA), in Nashik, Monday, Dec. 30, 2019. (PTI Photo) (PTI12_30_2019_000073B)
मुंबई, 28 एप्रिल : एकीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना महाराष्ट्रात राजकीय वादळही निर्माण झालं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आल्यानंतरही राज्यपालांनी विधानपरिषदेसाठी नेमणूक न केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पुनरुच्चार करण्यात आला. ‘राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीनं कार्यवाही करावी,या विनंतीचा पुनरुच्चार केला,’ अशी माहिती सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अजित पवार यांनी दिली आहे. मात्र राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेतला असता तर सध्या सुरू असलेला राजकीय गदारोळ निर्माण न होताही उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं असतं. काय होता राज्यपालांचा तो निर्णय, ज्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदापासून दूर गेले असते… विधानपरिषदेचे दोन जागा काही दिवसांपूर्वी रिक्त झाल्या. आघाडीत या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने राष्ट्रवादीकडून या दोन जागांवर शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र काही दिवस लोटल्यानंतरही राज्यपालांकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. अशातच कोरोनाच्या संकटकाळात विधानपरिषदेचे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय पेच निर्माण झाला. जर राज्यपालांनी शिफारस आल्यावर लगेच राष्ट्रवादीने सूचवलेल्या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केलं असतं तर उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा प्रवास आणखीनच खडतर झाला असता. परिणामी त्यांना मुख्यमंत्रिपद गमावावं लागलं असतं. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त दिलं आहे. हेही वाचा - सार्वजनिक कामांमध्ये पुढाकार घेणारे अनोखे व्यावसायिक आनंद महिंद्रा, वाचा त्यांची INSIDE STORY दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने राज्यपाल नियुक्त कोट्यातून सभागृहाचं सदस्य होणं, या पर्याय उद्धव ठाकरेंसमोर राहिला. त्यानंतर राष्ट्रवादीनेही आपल्या वाट्याची जागा उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. मात्र अनेक दिवस लोटल्यानंतरही अद्याप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. संपादन - अक्षय शितोळे