मुंबई, 5 सप्टेंबर : राज्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे. तर यानंतर आता हवामान खात्याने पावसाच्या संदर्भात आणखी एक इशारा दिला आहे. आता बाप्पाच्या विसर्जनादरम्यानही राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने काय म्हटलं? पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
वादळी वाऱ्याची शक्यता - तर यासोबतच कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिक, पुणे, सातारा येथील घाट भागात आज मध्यम स्वरूपाच्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.