दोस्त असावा तर असा
मुंबई : राज्याच्या इतिहासातील सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेता म्हणून स्व. गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतलं जातं. पण त्यांना विरोक्षीपक्ष नेता करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील मित्र विलासराव देशमुखांनी कशी मदत केली आणि मनोहर जोशींना कसा धोबीपछाड दिला त्याचा हा रंजक किस्सा आहे. स्व. विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हे जीवलग मित्र… लातूर-परळी ते वरळी सख्ये शेजारी आणि राजकारणात एकमेकांचे विरोधक. राजकारणातली दोन मित्रांची ही जोडी महाराष्ट्राची शान होती. मराठवाड्यातील या दोन नेत्यांच्या वक्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने लोकांना अक्षरश गारूड घातलं. त्यांना लोकनेते बनवलं. खरंतर अगदी कॉलेज जिवनापासून दोघे एकमेकांचे जीवलग मित्र. पण वेगवेगळ्या पक्षात, वेगळ्या विचारधारेत वाढलेले. अनेक मुद्दयांवरून दोघे आमने सामने आले पण त्यांनी मैत्रीत कधी अंतर येऊ दिलं नाही. त्याचाच हा किस्सा.. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत प्रभावी विरोक्षीपक्ष नेता अशी छाप उमटवणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा. भाजपचे गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षनेते व्हावेत म्हणून चक्क सत्ताधारी काँग्रेसमधील विलासरावांनीच कशी मदत केली त्याचा किस्सा खुद्द विलासराव देशमुख यांनीच सांगितला होता. त्याचं झालं असं… सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख संसदीय कार्यमंत्री. तर शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात कायम शितयुद्ध असायचं. त्याच दरम्यान भुजबळांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ घटलं. तर दुसरीकडे भाजप आमदारांचं संख्याबळ वाढलं. पण तरी विरोधीपक्ष नेतेपद मिळवायला भाजपला एक दोन आमदार कमी पडत होते. मग मित्र म्हणून ती व्यवस्था केली विलासरावांनी.
विरोक्षीपक्ष नेता निवडीच्या दिवशी सभागृहात विलासरावांनी जे घडवून आणलं ते अनेकांना आचंबित करणारं होतं. कामकाज सुरु होताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्या गोंधळातच मधुकरराव चौधरी जे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी गोपीनाथरावांच्या नावाची विरोक्षीपक्ष नेते म्हणून घोषणा केली. त्यानंतर विलासरावांनी गोपीनाथरावांचा हात धरून मनोहर जोशींच्या जागेवर नेवून त्यांना उभं केलं. त्यावेळी मनोहर जोशी वेलमध्ये अध्यक्षांसमोर चर्चेवर वाद घालत होते. त्यांनी जेव्हा वळून मागे बघितलं तेव्हा गोपीनाथराव त्यांच्या जागेवर उभे होते. विरोधीपक्ष नेता म्हणून. हिरमुसलेल्या मनोहर जोशींना कळलं आपला गेम झालाय. त्यानंतर चिडलेल्या मनोहर जोशींनी सभात्याग केला.आणि महाराष्ट्राला सर्वात प्रभावी विरोक्षीपक्ष नेता मिळाला.