आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला
गुवाहाटी, 27 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले. सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना विशेष भेट दिली आहे. नवी मुंबईमध्ये आसाम भवन उभारण्यासाठी जमीन देण्याचे आश्वासन शिंदेंनी दिलं आहे. तसंच, आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यास मदत करणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. तसंच राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली होती, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सरमा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसंच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले. (…तर सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी कार्यक्रम ठेवू, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा) ‘सत्ता संघर्षाचा काळात सलग 11 दिवस गुवाहाटीमध्ये होतो मात्र तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होतं. आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळालं. या केलेल्या मदतीतून उतराई होणं शक्य नसले तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले. (‘काय झाडी, काय डोंगार.’.चा मोह टाळला, 11 जणांनी मारली दांडी, कारणं आली समोर) तर, आसामचे मुख्यमंत्री हेमंता सरमा यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत अलेल्या 50 आमदारांनी भारत मातेचे नाव अधिक उंचावेल असं काम केलं असल्याचे गौरवोद्गार काढले. आपल्या पक्षाची दिशा चुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ती चूक दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांना लागलं ते सर्व सहकार्य आम्ही सरकार म्हणून केलं. आज महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने आणि वेगाने काम करतेय ते पाहून आम्ही केलेली मदत योग्यच होती याची खात्री वाटत असल्याचं मत सरमा यांनी व्यक्त केलं.