मुंबई, 17 जानेवारी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात दिलेली मुलाखत विविध कारणांनी चांगलीच रंगली आहे. या मुलाखतीत त्यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या असे आव्हान दिलं होतं. यानंतर अनेकांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शविली होती. या वादात निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. संजय राऊतांची 10 मिनिटं सुरक्षा हटवा, मग काय होतं ते बघा असं खुलं चॅलेंज त्यांनी राऊतांना दिलं आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला. उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला… भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.‘अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,’ असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते. उदयनराजे म्हणाले, कुणालाही ‘जाणता राजा’ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.