मुंबई, 22 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि भाजपचं (BJP) सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचं रिसॉर्ट (Anil Parab Resort) लवकरच तुटणार असल्याचं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मिलिंद नार्वेकरांचा (Milind Narvekar) बंगला तुटला आता अनिल परबांचं (Anil Parab) रिसॉर्ट तुटेल. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने साई रिसॉर्ट ऍण्ड सी कोन्च रिसॉर्ट पाडण्यासाठीची अंतिम ऑर्डर दिली आहे, असं सोमय्या त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकार आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना रिसॉर्ट पाडायला सांगेल. या पाडकामाची कारवाई जलद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.
काय आहे साई रिसॉर्ट प्रकरण? साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे, तसंच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केला गेल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 मध्ये दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टचा बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परब यांनी सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला. डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचा घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.