मुंबई, 10 नोव्हेंबर : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. विविध मागण्यांसाठी चंदा कोचर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाकडून कोचर यांची ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. न्यायमूर्ती रियाज छगला यांनी ही याचिका फेटाळताना कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ईडीकडून देखील कोचर यांच्या मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. काय आहेत चंदा कोचर यांच्या मागण्या? चंदा कोचर यांनी विविध मागण्यांसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. बँकेनं रखडवलेल्या आर्थिक भत्यांबाबतच्या निर्णयात न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी विनंती करणारी याचिका चंदा कोचर यांनी न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. या मागणीसोबतच बँकेनं आपल्याला अन्यायकारक पद्धतीने पदावरून हटवलं असा दावाही चंदा कोचर यांनी न्यायालयात केला होता. तसेच या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी देखील फेटाळून लावली आहे. तसेच बँकेचा निर्णय वैध असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. कोचर यांना दुहेरी दणका दरम्यान दुसरीकडे न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेचा अर्ज मंजूर करत कोचर यांना दुहेरी दणका दिला आहे. यानुसार कोचर यांना मिळालेल्या 6 लाख 90 हजार रुपयांच्या शेअर्सवर कोणताही व्यवहार करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जर यावर कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्यापूर्वी प्रतिज्ञापत्रात तपशील दाखल करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच कोचर यांनी, त्यांची संपूर्ण मालमत्ता 6 आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर जाहीर करावी असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. याचबरोबर चंदा कोचर यांनी चुकीच्या हेतून हा दावा दाखल केल्याचा ठपकाही न्यायालयानं आपल्या निकालपत्रात नमूद केला आहे.