कोल्हापूर, 31 मार्च : सध्या सगळ्याच पातळीवर कोरोनाव्हायरस बाबत जनजागृती सुरू आहे. पण गावच्या प्रथम नागरिक अशी ओळख असलेल्या एका सरपंच महिलेला आवाहन करतानाच अश्रू अनावर झाले आणि हा व्हिडीओ सध्या पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील सरपंच जोत्स्ना पठाडे यांनी मोबाइलवरून गावकऱ्यांना आवाहन करण्यासाठी ठरवलं आणि बोलत असताना त्या इतक्या भावूक झाल्या की त्यांना अश्रू अनावर झाले. ‘आपल्याला आपलं गाव कोरोनापासून दूर ठेवायचं आहे. मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारन्टाइन करून घ्यावं. मी तुमच्यासमोर गुडघे टेकते. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यावी,’ असं आवाहन करताना त्या आपले अश्रू रोखू शकल्या नाहीत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यात आता माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हरळी या गावात हा प्रकार घडला आहे. गावच्या प्रवेशद्वारावर माजी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. निवृत्त झाल्यानंतर अनेक दिवसांनी पुन्हा एकदा कर्तव्य बजावण्यासाठी हे माजी सैनिक समाजासाठी गावच्या वेशीवर आले आहेत. दिवसभरात वेळेनुसार या माजी सैनिकांनी स्वतःला तैनात केलं असून येणाऱ्या-जाणाऱ्याकडे कसून चौकशी करूनच त्यांना गावांमध्ये आणि इतर रस्त्यांवरून प्रवेश करू दिला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीला आता माजी सैनिक धावून आल्यामुळे नागरिकांमधूनही या सैनिकांच कौतुक होत आहे. अन्नधान्यासाठी पुढाकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातल्या अनेक वस्तूंचे दर सध्या चांगलेच वाढलेत तर भाज्यांचे दरही काही ठिकाणी वाढल्याच चित्र आहे. पण कोल्हापूरमध्ये कॉमन मॅन या सेवाभावी संस्थेकडून स्वस्तात भाजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेथीची पिंडी बऱ्याच ठिकाणी पंचविस ते तीस रुपयांना विकली जात असतानाही कॉमन संघटनेकडून कोल्हापूरकरांना फक्त दहा रुपयात मेथीच्या पेंडया विकण्यात आल्या. रेल्वे स्थानक परिसरातील बाजारामध्ये बाबा इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली कॉमन संघटनेने या भाज्या विक्री करण्यात आली.