पंढरपूर 28 फेब्रुवारी : कोरोनाचं संकट जगभर पसरलंय. त्याने आता अनेक देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. त्याचा फटका जगभरातल्या प्रवाशांना बसतोय. तिर्थयात्रेसाठी इराक आणि इराणमध्ये गेलेले महाराष्ट्रात 600 भाविक इराणची राजधानी तेहेरानमध्ये अडकले आहेत. तर देशभरातून तिथे 2 हजार भाविक अडकलेले आहेत. यात अकलुजच्या 44 भाविकांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे या देशांनी सीमा बंद केल्याने त्यांना अडकून पडावं लागलंय. आम्हाला तातडीने मायदेशी आणा असं आवाहन या भाविकांनी सरकारला केलंय. कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने ही ट्रीप आयोजित केली होती. 31 जानेवारीला हे भाविक तेहेरानमध्ये पोहोचले होते. तेहेरान जवळच्या कुम या शहरात हे सर्व भाविक सध्या अडकून पडले आहेत. आम्हाला तातडीने या शहरातून बाहेर काढा अशी विनंती त्यांनी केलीय. शियां पंथियांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या इराक आणि इराणमधल्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी हे भाविक तिथे गेले होते. त्याच दरम्यान कोरोनाचं संकट निर्माण झाल्याने त्या देशांनी आपल्या सर्व सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे तिथून बाहेर पडणं आणि येणं हे बंद आहे. या भाविकांना परत आणण्यासाठी आता सरकार कुठले पाऊल उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
कोरोना पसरतोय आतापर्यंत जगातील तब्बल 48 देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. WHO कडून नियंत्रणाचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असंही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग झाल्या आहेत. चीनमधल्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भीषण झाली होती. चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये सॅमसंग, LG या कंपन्यांचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन होतं. नेमक्या याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे.