नाना पटोले (प्रातिनिधिक फोटो)
नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 4 जून : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार सोनिया यांना 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना 3 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राहुल गांधी सध्या परदेशात असल्याने त्यांची 13 किंवा 14 जूनला चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातीलही राजकारण (Maharashtra Politics) तापण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडी समन्सवरुन ईडी अधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात तर लावून दाखवा, असा उल्लेख करत पटोलेंनी ईडीला धमकीवजा इशारा दिला आहे. नाना पटोले नेमकं काय म्हणाले? “आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावून दाखवा, जेवढे जेल भरायचे आहे तितके देशातील, महाराष्ट्रातील जेल भरवून दाखवू”, असा इशारा नाना पटोले यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिला आहे. ते भंडाऱ्यात जाहीर सभेत बोलत होते. ( ‘काश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही ) “2015 च्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीच्या नोटीस आल्या आहेत. आम्ही देशात नवसंकल्प कार्यक्रम राबवत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीक काँग्रेससोबत जोडले जात आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आपली खुर्ची जाण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपला वाटत असल्यामुळे गांधी परिवाराला टार्गेट केलं जात आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली. “कोणतेही नॉर्म नसताना सरळ ईडीची नोटीस पाठवून दिली आहे. सत्तेचा दुरुपयोग केंद्रीय तपास यंत्रनेच्या माध्यमातून होत आहे. मात्र आमची भूमिका ठरली आहे. आमच्या नेत्यांना हात लावला तर जेवढे जेल भरायचे आहे तितके देशातील, महाराष्ट्रातील जेल भरवून दाखवू”, अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली आहे.