Shrikant Shinde Eknath Shinde
कल्याण, 7 सप्टेंबर : शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप (Shivsena BJP) एकत्र आले, दोघांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केलं, पण या दोघांमध्ये सगळं काही आलबेल आहे, असं नाही. आधी अमरावतीमधल्या आणि आता कल्याणच्या लोकसभेच्या (Kalyan Loksabha) जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये ताणाताणी सुरू झाली आहे, कारण भाजप नेत्याने कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला. कल्याणमधून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) खासदार आहेत. आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्र लढवतील, अशी घोषणा दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केली आहे, पण आता या दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर या रविवारपासून कल्याण दौऱ्यावर आहेत. त्याआधी भाजपचे कल्याण प्रभारी संजय केळकर यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा दिला. कल्याणवर संजय केळकर यांनी दावा सांगितल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणवर दावा नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदेंसोबत जे लोक आले आहेत, त्यांच्या कोणाच्याही जागेवर आम्ही कशाला दावा करू? असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. कल्याण मतदारसंघावर दावा नसल्याचं सांगितल्यानंतर शिंदे गटाचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघाचा देवा केल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. हे सांगतानाच त्यांनी पुढच्या निवडणुका भाजपा-सेना युती म्हणू लढू हे अमित शाह आणि फडणवीस यांनी सांगितल्याचंही स्पष्ट केलं.