मुंबई, 15 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुंचल्यातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘फटकारे’ ओढत असतात. आता राज यांच्या या व्यंगचित्राला भाजपचे जशाच तसे उत्तर दिले आहे. भाजपने एक व्यंगचित्र टि्वट केले आहे. पण या टि्वटमुळे भाजपच ट्रोल झाली आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी पतंग उडवत आहे आणि अमित शहा बाजूला चक्री गुंडाळत आहे. हवेत असलेल्या पतंगावर सवर्णांना दिलेल्या 10 टक्के आरक्षण आणि इतर असं सांगत नव्या थापा, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. तसंच या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीमागे भक्त उभे असल्याचं दाखवलं आहे.
आता हेच व्यंगचित्र घेऊन भाजपने आपल्या ‘भाजप महाराष्ट्र’ या टि्वटर अकाऊंटवरून एक व्यंगचित्र टि्वट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरेंना बोलघेवडा अशी टीका करून ‘बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच’, असल्याची टीका केली आहे. या व्यंगचित्रात राज यांच्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
परंतु, या व्यंगचित्रामुळे भाजपच ट्रोल झाली आहे. राज यांचेच खरे व्यंगचित्र घेऊन त्यात छेडछाड करून हे टि्वट करण्यात आले आहे. राज यांच्या व्यंगचित्रात मोदी आणि शहा यांच्या पाठीमागे ‘भक्त’ उभे असल्याचं दाखवलं आहे. तर भाजपच्या व्यंगचित्रात ‘नमो रुग्ण’ दाखवण्यात आले आहे. ‘नमो रुग्ण’ दाखवल्यामुळे भाजप ट्रोल झाली आहे. टि्वटरवर मनसेसैनिकांनी भाजपच्या आयटी सेलवर सडकून टीका केली आहे.
=====================