दिशा सालियान मृत्यू प्रकरण
विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग**, 23 नोव्हेंबर :** अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर राणेंनी गंभीर आरोपही केले होते. सीबीआयच्या या निष्कर्षानंतर पुन्हा आता नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले नितेश राणे - दिशा सालीयन संदर्भात मी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं आहे. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी मग प्रकारांमध्ये संशयित तपास का दाखवला. आजही पोस्टमार्टम रिपोर्ट का लपवला जातो, असा सवाल करत त्यांनी सीबीआयकडे तपास करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असा दावा केला आहे. काय आहे प्रकरण - 28 वर्षाच्या दिशा सालियानने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता, त्यानंतर नारायण राणेंनी गंभीर आरोपही केले होते. हेही वाचा - दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लिन चीट? CBI ने काढली राणेंच्या आरोपातून हवा! दरम्यान, या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी रिफायनरीवरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन रत्नागिरीमध्ये ग्रीन रिफायनरी होणार आहे, असे म्हटले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हा प्रकल्प आणत आहेत. त्यामुळे कोकणातील बेरोजगार तरुणांना फायदा होईल, असे ते म्हणाले. तर रिफायनरीचा प्रकल्प नुसता रत्नागिरीसाठी न राहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही निवडक भागदेखील घेण्यात येतील. त्यासाठी देवगड तालुक्यातील काही गावांचा समावेश असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले असल्याचेही राणे म्हणाले. तसेच राज्य सरकार प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणार आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल राणेंनी त्यांचे कौतुक केले. जे लालूप्रसाद यादव हिंदुत्वविरोधी आहेत, त्यांना आदित्य ठाकरे भेटायला जातात हेच काय ठाकरेंच्या नातवाचे हिंदुत्व, असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.