बीड, 25 जुलै : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी अनेक वेळा त्यांच्या समर्थकांकडून केली जाते. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर मंत्रिमंडळात तरी पंकजा मुंडेंना मोठं पद द्यावं अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीडमधील परळीत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. विशेष म्हणजे या बॅनरवर भाजपच्या एकाही बड्या नेत्याचा फोटो दिसला नाही. काही बॅनरवर तर केवळ गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंचा फोटो होता. पंकजा मुंडे यांना सतत डावललं गेल्याने पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तीच नाराजी आता वाढदिवसाच्या बॅनर वर हे दिसून येत आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या जास्त चर्चा आहे. भाजप नेत्यांनाही बॅनरवरुन केलं गायब… सर्वसाधारणपणे पक्षांच्या बॅनरवर वरिष्ठ नेत्यांचाही फोटो असतो. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे फोटो दिसतात. मात्र पंकजा मुंडे यांच्या बॅनरवर मराठवाड्यातील तसेच भाजपमधील एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो वा नाव नव्हतं. यावर पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाकडूनही फार मोठी जबाबदारी दिली नव्हती. विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आलं. राज्यात नवं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांचा नाव काही काळ उपमुख्यमंत्री पदासाठी ही चर्चेत आलं. मात्र तसंही घडलं नाही. पंकजा मुंडेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसून येत आहे.